नवी दिल्ली - तळागाळातील स्तरावरील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने एकूण १४.३० कोटींची तरतूद बजेटमध्ये केली आहे. या अंतर्गत सात राज्यातील १४३ ठिकाणी 'खेलो इंडिया' केंद्रे उभी करण्यात येणार आहेत.
'खेलो इंडिया' ही केंद्रे महाराष्ट्र, मिझोरम, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर येथे सुरू केली जातील.
प्रत्येक केंद्रावर एक क्रीडा शिस्त सोपविण्यात येईल. देशभरातील तळागाळात पायाभूत सुविधांची उपलब्धता व्हावी यासाठी राज्य सरकारांच्या भागीदारीत खेळ मंत्रालयाने खेलो इंडिया ही केंद्रे सुरू केली आहेत.
"२०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्या १० देशांपैकी एक बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्याला लहान वयातूनच मोठ्या संख्येने प्रतिभावान खेळाडूंची ओळख पटविणे आवश्यक आहे," असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
"जिल्हा पातळीवरील खेलो इंडिया केंद्रांवर चांगले प्रशिक्षक आणि उपकरणे उपलब्ध झाल्यामुळे मला खात्री आहे, की आम्हाला योग्य खेळासाठी आणि योग्य वेळी योग्य मुले मिळू शकतील."
जून २०२० मध्ये मंत्रालयाने चार वर्षांच्या कालावधीत सुमारे १००० नवीन खेलो इंडिया केंद्रे उघडण्याची योजना आखली होती. यात देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र असेल.
अनेक राज्यांमध्ये अशी २१७ केंद्रे आधीच कार्यरत आहेत, तर मंत्रालयाने ईशान्य, जम्मू-काश्मीर, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप आणि लडाख या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी दोन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या केंद्रांसाठी प्रशिक्षकांची नेमणूक करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.