नवी दिल्ली -क्रीडा मंत्रालयाने उत्तर प्रदेशचा बॉक्सिंगपटू सुनील चौहान आणि त्याचा भाऊ तिरंदाज नीरज चौहान यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. वडिलांच्या निधनानंतर सुनील आणि नीरज यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुनील आणि नीरज यांच्या वडिलांची कोरोनामुळे नोकरी गेली होती. त्यांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करावा लागत होता.
दोन भावांच्या मदतीसाठी धावले क्रीडा मंत्रालय - बॉक्सिंगपटू सुनील चौहान न्यूज
बॉक्सिंगपटू सुनील चौहान आणि त्याचा भाऊ तिरंदाज नीरज चौहान यांना पाच लाख रुपयांचे अनुदान देण्याचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले आहे. वडिलांच्या निधनानंतर सुनील आणि नीरज यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुनील आणि नीरज यांच्या वडिलांची कोरोनामुळे नोकरी गेली होती.
पंडित दीन दयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अनुदान क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केले आहे. हा निधी खेळाडूंना मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. रिजीजू यांनी ट्वीट केले, ''बॉक्सर सुनील आणि तिरंदाज नीरजच्या मदतीसाठी दीन दयाल उपाध्याय निधीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे.''
या मदतीनंतर सुनील म्हणाला, ''ही आर्थिक मदत मला आणि माझ्या कुटुंबासाठी खूप उपयुक्त ठरेल. आम्हाला गरज असताना मदत केल्याबद्दल मंत्री महोदयांचे आम्ही आभारी आहोत." सिनियर तिरंदाजी चॅम्पियनशिप -२०१८मध्ये नीरजने रौप्य पदक जिंकले तर सुनीलने खेलो इंडिया गेम्स -२०२०मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.