नवी दिल्ली - क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्या बॉक्सिंगपटूंचा सन्मान केला आहे. या स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या अमित पांघल आणि मनीष कौशिक यांना मानधन देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
अमित पांघल आणि मनीष कौशिक हेही वाचा -GREAT!..रोनाल्डोला पछाडत मेस्सी ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू
५२ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा बॉक्सिंगपटू अमित पांघलला १४ लाख तर ६३ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकणाऱ्या मनीष कौशिकला आठ लाख रुपये देण्यात आले. या दोघांसोबतचा फोटो रिजिजू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या दोघांना रिजिजू यांनी 'आपली दोन अनमोल रत्ने' असे म्हटले आहे.
बॉक्सर अमित पांघलला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अमितला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या एस. झोइरोव्हकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवाबरोबर त्याचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
याआधी विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताकडून विजेंदर सिंह, विकार क्रिशन, शिव थापा, गौरव बिधुरी या खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली होती. यंदाच्या यंदाच्या स्पर्धेत भारताच्या मनिष कौशलने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर अमित पांघलने रौप्य जिंकत ऐतिहासीक कामगिरी केली. मात्र, अद्याप भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.