मुंबई - भारतीय अॅथलिट शैली सिंह हिने नैरोबी येथे पार पडलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अंडर-20 चॅम्पियनशीप स्पर्धेत लांब उडी खेळात रौप्य पदक जिंकले. शैलीने 6.59 मीटर लांब उडी मारत ही कामगिरी केली. तिचे सुवर्ण पदक फक्त एका सेंटीमीटरने हुकले. यादरम्यान, केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शैली सिंहच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे.
अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलं की, 'शैली सिंहने रौप्य पदक जिंकले, ही देशासाठी चांगली बातमी आहे. भारतासाठी रौप्य पदक जिंकल्याबद्दल मी तिचेअभिनंदन करतो. तिचे प्रदर्शन शानदार होते. फक्त एका सेंटीमीटरने तिचे सुवर्ण पदकहुकले. पण तिची कामगिरी कौतुकास्पद ठरली. आपले युवा अॅथलिट चांगली कामगिरी करत आहेत, याचे हे संकेत आहेत.'
भारताने रविवारी नैरोबीमध्ये दोन रौप्य पदक आणि एक कास्य पदकासह आपल्या अभियानाचा शेवट केला. मिक्स्ड 4x400 मीटर रिले स्पर्धेत भारताने कास्य पदक जिंकले. यानंतर 10,000 मीटर रेस वॉकमध्ये अमित खत्रीने रौप्य पदकाची कमाई केली.