नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरशीची लढत झाली. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाने स्पर्धेतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव करताना भारताच्या हरमनप्रीत आणि स्मृती जोडीने दमदार खेळी केली.
भारताच्या 20 षटकांत 2 गडी गमावून 167 धावा :नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 गडी गमावून 167 धावा केल्या. 168 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला 20 षटकांत 4 गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या. 23 जानेवारीला झालेल्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या स्मृती मंधानाने 74 धावांची नाबाद खेळी केली.
मालिकेत टीम इंडियाचे 4 गुणांसह पहिले स्थान कायम :वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाने 4 गुणांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ सर्व सामने गमावून शेवटच्या क्रमांकावर आहे. या पॉइंट टेबलवर यजमान संघ दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताला आपला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.