नवी दिल्ली - भारतीय नेमबाजी महिला संघाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या संघात चिंकी यादव, मनू भाकेर आणि महाराष्ट्रीयन राही सरनोबत आहे.
भारतीय तिकडीने अंतिम सामन्यात पोलंडच्या इनोवा वावरजोनोवस्का, युलिता बोरेक आणि एग्निस्का कोरेज्वो यांचा सहज पराभव केला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात १७ गुण मिळवले. तर पोलंडला केवळ ७ गुण घेता आले.
दरम्यान, एकदिवसाआधी चिंकी यादव, मनू भाकेर आणि राही सरनोबत यांनी या स्पर्धेत वैयक्तिक तीन पदकं जिंकली आहेत. या विजयासह भारताचे पदकतालिकेतील स्थिती अधिक मजबूत झाली आहे. भारताच्या नावे या स्पर्धेत आतापर्यंत १० सुवर्ण, सहा रौप्य आणि ५ कांस्य पदक असे मिळून एकूण २१ पदकं आहेत.