मुंबई - भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंह यांचे वयाच्या ९१ वर्षीं निधन झाले. 'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंह यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले होते. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी मोहालीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिल्खा सिंह यांच्या निधनावर सचिन तेंडुलकर समवेत क्रीडा जगतातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
सचिन तेंडुलकरने ट्विट करत म्हटलं की, 'आपले फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांच्या आत्मास शांती लाभो. त्यांच्या निधनाने आज प्रत्येक भारतीयांचे हृदय रिकामं झालं आहे. पण येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुम्ही प्रेरणा राहाल.'
महान व्यक्ती मिल्खा सिंह जी आपले शरीर सोडून गेले आहेत, पण मिल्खा सिंह हे नाव धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक म्हणून सदैव स्मरणात राहील, असे सेहवागने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
माझी प्रेरणा मिल्खा सिंहजी यांच्या निधनाने दु:खाचे गडद ढग कायम आहेत. त्यांच्या निर्धार आणि परिश्रमच्या या कथेतून लाखो लोकांना प्रेरणा मिळाली आणि ती अजूनही सुरूच आहे, असे सांगत पीटी उषाने मिल्खा सिंह यांच्यासोबत प्रशिक्षणादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे.