यवतमाळ - जिल्ह्यामध्ये शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मात्र, १४ वर्षे वयोगटातील खेळाडूंना निकृष्ठ मैदानामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. आयोजकांनी लहान-लहान खड्यांनी भरलेले मैदान उपलब्ध करुन दिल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी 'त्या' मैदानावर सामना खेळण्यास नकार दिला. यामुळे आयोजकांना स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुक्यात शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दाते डीएड कॉलेजच्या इनडोअर हॉलमध्ये खेळवण्यात येत आहे. मात्र, या इनडोअर हॉलमध्ये असलेले मैदान लहान-लहान खड्यांनी भरलेले आहे.
जिल्हा क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी... हेही वाचा -'संपर्क तुटला, संकल्प नाही'; यवतमाळमध्ये गणपतीची आरास सजली चांद्रयानच्या देखाव्याने
मैदानाची स्थिती पाहून विद्यार्थ्यांनी सामना खेळण्यास नकार दिला. तर तालुक्यातून आलेल्या शिक्षकांनीही मैदान पाहताच सामना खेळताना विद्यार्थी जखमी झाला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल केला आणि सामना न खेळण्याचा निर्धार केला. खेळण्यायोग्य मैदान उपलब्ध करून दिल्यानंतरच विद्यार्थ्यी मैदानात उतरतील असा आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतला. यामुळे आयोजकांना शेवटी ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली.
हेही वाचा -VIDEO : बैल जेव्हा उधळतो.. पाहा यवतमाळच्या पोळ्यातील बैलाचा थरार
दरम्यान, या स्पर्धेसाठी यवतमाळ तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने आले होते. मात्र, आयोजकांकडून निकृष्ठ दर्जाने मैदान उपलब्ध करुन दिल्याने, विद्यार्थांच्या हिरमोड झाला. विद्यार्थ्यांनी मैदानावरिल लहान दगड गोळा केली. मात्र, अख्खे मैदानभर दगड पसरल्याने, सामना न खेळणेच विद्यार्थ्यांनी पसंत केले.