रायगड - सलग तीन रात्र व चार दिवस, खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करत सहा चिमुरड्या जलतरणपटूंनी विक्रम नोंदवला आहे. पेणमधील या जलतरणपटूंनी तब्बल २३३ किलोमीटर अंतर रिले पद्धतीने पोहून पार केले. विक्रम नोंदवल्यानंतर चिमुरड्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले.
भावेश कडू (वय १२), निल वैद्य (वय १२), मधुरा पाटील (वय १२), श्रवण ठाकूर (वय १४), अथर्व लोधी (वय १४) आणि सोहम पाटील (वय १३ ) असे विक्रम नोंदवलेल्या जलतरणपटूंची नावे आहेत. या चिमुरड्यांनी धरमतर बंदरावरून सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी पोहण्यासाठी सुरूवात केली.
धरमतर ते एलिफंटा हे अंतर त्यांनी सलग सहा वेळा, ७५ तास ७ मिनिट आणि ५५ सेकंदात पार केले आणि एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला. त्यांना ही कामगिरी करण्यासाठी ३ रात्र आणि ४ दिवस लागले. पोहताना त्यांना भरती-ओहोटीचा सामना करावा लागला.
विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्येवर मात करता यावे, यासाठी दिवसा-बरोबरच रात्री देखील समुद्रात पोहण्याचा सराव घेतला, असल्याचे प्रशिक्षक हिमांशू मलबारी यांनी सांगितले. दरम्यान, याआधी रिले पद्धतीने १६६ किलोमीटर अंतर पोहून पार करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम या जलतरणपटूंनी मोडित काढत नव्या विक्रमाची नोंद केली.
पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विक्रम नोंदवणाऱ्या जलतरणपटूंचे कौतुक केले. यावेळी अनिरुद्ध पाटील, वैकुंठ पाटील, मंगेश नेने, कुमार थत्ते, मिलिंद पाटील, हिरामण भोईर यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक नातेवाईक आणि क्रीडा रसिक उपस्थित होते.