नवी दिल्ली - जगभरातील खेळाडूंचे लक्ष लागून असलेल्या इंडिया ओपन स्पर्धेला आजपासून दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी चीन, जपानसह देशभरातील खेळाडू विजयी पताका फडकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताची स्टार खेळाडू पी व्ही सिंधूदेखील या वर्षातील आपली विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील वर्षी पी व्ही सिंधुला थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगकडून सेमिफायनलमध्ये हार पत्करावी लागली होती. इंडिया ओपन स्पर्धेत मात्र सुपानिडा कटेथोंगसोबतचा सिंधूचा सलामीचा सामना रंगणार आहे.
पी व्ही सिंधूचा पहिला सामना होणार सुपानिडा कटेथोंगसोबत -पी व्ही सिंधूचा आज महिला एकेरीतील सलामीचा सामना थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगसोबत होणार आहे. पी व्ही सिंधूला मागील वर्षी थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगने सेमीफायनलमध्ये हरवले होते. मात्र सोमवारी पी व्ही सिंधूने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत छेडले असता, पी व्ही सिंधूने पराभवाचा वचपा काढल्याचे स्पष्ट केले. आपल्या काही चुका झाल्या होत्या, त्यावर काही नवीन काम सुद्धा केल्याचे पी व्ही सिंधूने स्पष्ट केले. या नवीन मालिकेत तुम्हाला ते बदल स्पष्टपणे दिसतील असेही पी व्ही सिंधूने यावेळी बोलताना सांगितले.
या दहा खेळाडूवर राहणाणार सगळ्यांच्या नजरा
1) अकने यामागुची ( Akane Yamaguchi ) -जपानची स्टार खेळाडू अकने यामागुची ही इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानली जाते. अकने यामागुचीने आतापर्यंत सलग दोन जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यात 2021 आणि 2022 मध्ये तिने जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहेत. तसेच तिने इंग्लंड ओपन स्पर्धा, जपान ओपन स्पर्धेसह एशियन चाम्पियनशीपमध्ये पदक जिंकले आहे. अकने यामागुचीने उत्कृष्ट खेळ करत मलेशिया ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठून यावर्षीची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यासह अकने यामागुची इंडिया ओपन स्पर्धेत चमकदार खेळी करत आपली विजयी पताका फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करेल.
2) चेन युफेई -चीनच्या चेन युफेईने भारतात पाऊल ठेवले तेच इंडिया ओपन स्पर्धेत विजयी पताका फडकावून नवीन वर्षाची नवी सुरुवात करण्यासाठी. चेन युफेई ही 2022 मध्ये बीडब्लूएफ जागतिक स्पर्धेत हारल्यामुळे नैराश्याने ग्रासली होती. त्यानंतरही ती सुपर 300, सुपर 500 आणि सुपर 750 स्पर्धेत हरली होती. मागील वर्षी तर युफेईला अकने यामागुचीने हरवले होते. त्यामुळे जागतिक स्तरावरील दोन क्रमांकाची खेळाडू या स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
3) अॅन से यांग ( साऊथ कोरिया ) -साऊथ कोरियाची स्टार बॅडमिंटनपटू म्हणून अॅन से यांगचा उल्लेख करण्यात येतो. मोस्ट प्रॉमीसिंग प्लेअर ऑफ दर इयर म्हणून तिचा बीडब्लूएफ स्पर्धेत गौरव करण्यात आला होता. तिच्याकडे आतापर्यंत 11 बीडब्लूएफ पदके आहेत, तर पाच उपविजेते पदावरही तिने आपले नाव कोरले आहे. जागतिक पातळीवरची चौथ्या क्रमांकावरची खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या स्पर्धेतही ती चांगली खेळी करण्यासाठी सज्ज झाली आहे.
4) पी व्ही सिंधू -भारताची सुप्रसिद्ध बॅटमिंटन खेळाडू म्हणून पी व्ही सिंधूचा नावलौकिक आहे. 27 वर्षाच्या पी व्ही सिंधूने जागतिक पातळीवरील अनेक पदकांवर आपले नाव कोरले आहे. पी व्ही सिंधूने दोन वेळा इंडिया ओपन स्पर्धा जिंकली आहे. पी व्ही सिंधूने दोन वेळा वर्ल्ड चाम्पियनशीप स्पर्धेची पदके आपल्या खिशात घातली आहेत. तर तब्बल पाच वेळा तिने महिला एकेरीची विजेतेपद पटकावले आहे. मागच्या वर्षी पी व्ही सिंधूने कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक पटकावले होते. आता तर दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयमवर पी व्ही सिंधूला मायदेशातील नागरिकांचे पाठबळ मिळणार असल्याने तिचा उत्साह चांगलाच वाढणार आहे. त्यामुळे पी व्ही सिंधूवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या जाणार आहेत. आज पी व्ही सिंधूचा सामना सुपानिडा कटेथोंगसोबत होणार आहे.