ओडिशा - येथे प्रथमच पार पडलेल्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये पंजाब विद्यापीठाने पदकाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत जेतेपद जिंकले. यापूर्वी पंजाब विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात चुरशीची स्पर्धा रंगली होती, पण अखेर पंजाबने बाजी मारली.
पुरस्कारासह पंजाब विद्यापीठ हेही वाचा -आयपीएलसाठी 'थाला' चेन्नईत दाखल, नवीन लुक ठरतोय सोशल मीडियावर 'किलर'
शेवटच्या दिवशी पंजाबने बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्ण जिंकून पुणे विद्यापीठाला मागे टाकले, तर शेवटच्या दिवशी पुण्याला अॅथलेटिक्समध्ये केवळ एक सुवर्णपदक मिळवता आले. अशा परिस्थितीत पंजाब आणि पुणे हे दोघेही १७ सुवर्णपदकांसह बरोबरीत होते. त्यानंतर रौप्यपदकाची मोजणी झाली. त्यामध्ये पंजाबच्या खात्यात १९ आणि पुण्याच्या खात्यात ११ रौप्य पदके आहेत.
पंजाबने एकूण ४६ तर, पुणे विद्यापीठाने ३७ पदके जिंकली आहेत. पुण्यानंतर पंजाबी विद्यापीठ, पटियालाने ३३ पदकांसह तिसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक उपस्थित होते. या व्यतिरिक्त क्रीडामंत्री किरेन रिजिजू, आयओएचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र बत्रा यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप करण्यात आला.