रियाध : सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि रियाध इलेव्हन यांच्यात एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोसारख्या स्टार खेळाडूंची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पीएसजी विरुद्ध रियाध इलेव्हन प्रदर्शनीय सामना : पॅरिस सेंट जर्मन आणि रियाध इलेव्हन यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी आमनेसामने आले होते. लिओनेल मेस्सी पीएसजी संघाकडून खेळतो तर क्रिस्टियानो रोनाल्डोने रियाध सीझन इलेव्हनचे नेतृत्व केले. अल नासेर आणि अल हिलाल या सौदी अरेबियाच्या दोन क्लबच्या खेळाडूंनी मिळून रियाध इलेव्हन टीम बनवली गेली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोने अलीकडेच अल नासेरसोबत विक्रमी करार केला आहे.
अमिताभ बच्चन फुटबॉलचे चाहते आहेत : या प्रदर्शनी सामन्यादरम्यान बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चनही दिसले. यावेळी अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांनी सामन्याआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेतली. सर्वप्रथम त्यांनी मेस्सीसह पीएसजीच्या खेळाडूंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रियाध सीझन इलेव्हनच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले, ज्यामध्ये रोनाल्डोचाही समावेश होता. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते फुटबॉलचे चाहते आहेत. ते इंग्लिश प्रीमियर लीग क्लब चेल्सीचे समर्थक असल्याचे त्यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा देखील फुटबॉलचा मोठा चाहता आहे. तो इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी या फुटबॉल संघाचा मालक आहे.
प्रदर्शनीय सामन्यात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश : या प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होणाऱ्या इतर प्रमुख खेळाडूंमध्ये फ्रान्सचा किलियन एमबाप्पे, स्पेनचा सर्जिओ रामोस आणि ब्राझिलच्या नेमारचा समावेश आहे. एम्बाप्पे, रामोस आणि नेमार हे तिघेही पॅरिस सेंट-जर्मेनचे खेळाडू आहेत. सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारे सालेम अल-दवसारी आणि सौद अब्दुलहमीद हे देखील या प्रदर्शनीय सामन्याचा भाग होते. लिओनेल मेस्सीबद्दल सांगायचे तर, त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकले होते. मेस्सी विश्वचषकानंतर पीएसजीमध्ये दाखल झाला. मात्र फ्रेंच लीग 1 पुन्हा सुरू झाल्यानंतर पीएसजीची कामगिरी काही विशेष राहिली नाही. दुसरीकडे इंग्लिश प्रीमियर लीगच्या मॅंचेस्टर युनायटेड संघाला बाय-बाय केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदीच्या अल नासरशी करार केला. त्यानंतर हा त्याचा पहिलाच सामना होता. रोनाल्डो 24 जानेवारी रोजी अल नासरसाठी पहिला सामना खेळणार आहे.
हेही वाचा :ICC Womens world cup 2023 : शेफाली - श्वेता जोडीची कमाल, भारताचा युएईवर 122 धावांनी विजय