मुंबई- आगामी सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. यंदाच्या मोसमासाठी इराणच्या फझल अत्राचलीकडे यू मुंबाची धुरा असणार आहे. तर उपकर्णधार म्हणून संदीप नरवाल याची नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या 20 जुलैपासून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाची सुरुवात होणार आहे. या मोसमात यू मुंबाची पहिली लढत यजमान तेलुगू टायटन्सशी होणार आहे. दरम्यान, यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात यू मुंबाने 36-30 अशा फरकाने बंगळुरू बुल्सला पराभूत केले होते. त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
कर्णधारपदी निवड झाल्यानंतर इराणचा फझल म्हणाला की, यू मुंबाच्या कर्णधारपदी निवड झाल्याचा आनंद आहे. व्यवस्थापनाने दिलेल्या जबाबदारीमुळे मला उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या स्पर्धेत संघाला जेतेपद पटकावून देण्याचे माझे लक्ष्य असेल असे त्याने सांगितले.