नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'च्या माध्यमातून रविवारी देशाला संबोधित केले. यावेळी मोंदीनी आपल्या संदेशात भारतातील इनडोअर खेळांच्या महत्त्वावर जोर दिला आहे. हे क्रीडाप्रकार नव्या अवतारात आणायला हवेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, "आपण भारतातील पारंपारिक इनडोअर क्रीडाप्रकार नवीन आणि आकर्षक अवतारात सादर केले पाहिजेत. त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे संकलन आणि पुरवठा करणारे स्टार्टअप्स खूप लोकप्रिय होतील. हे लक्षात ठेवा की आपले भारतीय खेळ स्थानिक आहेत, आणि या स्थानिक गोष्टींचा प्रचार-प्रसार करणार असल्याचे आपण यापूर्वीच वचन दिले आहे.''
ते म्हणाले, "पारंपारिक खेळ हा आपल्या देशाचा वारसा आहे. पाचीसी या खेळाचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. हा खेळ तमिळनाडूत पल्लंगुली म्हणून ओळखला जातो. कर्नाटकातील त्याला अल्लू गुली असे म्हणतात. आंध्र प्रदेशात तो वामन गुंटलू म्हणून ओळखले जावे."
मोदी पुढे म्हणाले, "ऑनलाइन खेळांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला इनडोअर खेळ मुलांपर्यंत पोहोचवावे लागतील. आपल्या तरुण पिढीसाठी आणि स्टार्टअपसाठीही आता एक नवीन संधी आहे."
मोदींनी मोक्षपट्टम, परम पदम आणि गुट्टा या पारंपारिक इनडोअर खेळांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "गुट्टा हा खेळ सर्व खेळतात. फक्त एकाच आकाराचे पाच दगड उचलून घ्या आणि तुम्ही गुट्टा खेळायला तयार आहात."