नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आज उत्तर प्रदेशच्या नवाबगंज येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात दुपारी 4 नंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. आंतराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 हून अधिक कुस्तीपटूंनी काल जंतरमंतरवर महासंघाचा निषेध केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण सिंह यांना २४ तासांच्या आत राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्याचवेळी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.
जीवे मारण्याची धमकी : विनेशने असेही सांगितले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तक्रार केल्याबद्दल तिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. ती म्हणाली, छळाची तक्रार पंतप्रधानांकडे केल्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. कुस्तीपटू डब्ल्यूएफआय प्रशासनात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे डब्ल्यूएफआय प्रमुखावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
हरियाणा कुस्ती संघात केले बदल :हरियाणातील कुस्ती संघ काही दिवसांपूर्वी बदलण्यात आला होता. त्यानंतर तिथे निवडून आलेला संघाचे मंडळ कार्यरत आहे. मात्र काही लोकांनी क्रीडा मंत्री आणि कुस्तीपटू बबिता फोगट यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महासंघाची स्थापना केली. त्यांना त्यांच्या निवडलेल्या उमेदवारांची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड करायची होती. मात्र याला विरोध केल्यामुळे आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचेही बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.