भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु आहे. मागील तीन दिवसांमध्ये भारताच्या स्टार जलतरणपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत कर्नाटकने १९ पदकांची कमाई करत अव्वल स्थान राखले आहे.
हेही वाचा -राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जलतरणपटू ऋजुता खाडेने जिंकले सुवर्णपदक
या यादीत महाराष्ट्राने दुसरे स्थान राखले आहे. त्यांनी १७ पदके पटकावली आहेत. पुरुष वर्गात कर्नाटकाच्या जलतरणपटूंनी आठ सुवर्णपदके, दोन रौप्यपदके आणि दोन कांस्यपदकाची तर, महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी दोन सुवर्णपदके, एक रौप्यपदक आणि चार कांस्यपदकाची कमाई केली आहे.
हेही वाचा -राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेने मोडला स्वत:चाच विक्रम
महिलांमध्ये सांगायचे झाले तर, महाराष्ट्राने चार सुवर्णपदके, तीन रौप्यपदके आणि तीन कांस्यपदके पटकावली आहेत. ५० मीटर फ्री स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋजुता खाडेने सुवर्णपदक जिंकले. तर, राष्ट्रीय सिनियर जलतरण स्पर्धेत अपेक्षा फर्नांडिसने अव्वल क्रमांक पटकावला. महिला गटातील २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तिने ही कामगिरी केली. मात्र, अवघ्या एका सेकंदाने आपला याआधीचा विक्रम तोडण्यापासून ती दूर राहिली.