चेन्नई -भारतीय संघ फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ग्रुप बी मध्ये अजेय राहिला. तसेच गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावत भारताने शुक्रवारी उपांत्य फेरीत धडक मारली. लीग स्टेजच्या अंतिम दिवशी भारताने हंगेरी आणि मोल्दोवावर विजय मिळवला. तर स्लोवेनियाविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला.
माजी विश्वचॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने लीग स्टेजमधील 9 सामन्यातील 7 विजयासह आणि दोन सामन्यात बरोबरी साधत 16 गुणांची कमाई केली. भारतीय संघ ग्रुप बीमध्ये अव्वल राहिला. हंगेरीचा संघ 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. भारत आणि हंगेरी हे दोन संग प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरले.
भारताने हंगेरीचा 4-2 ने धुव्वा उडवला. या सामन्यात विश्वनाथन आनंदसह वरिष्ठ महिला खेळाडू कोनेरू हम्पी आणि निहाल सरीन यांनी विजय मिळवला. तर डी हरिका आणि आर. वैशाली यांनी बरोबरी साधली. पी हरिकृषाचा इमरे बलोगकडून पराभव पत्कारावा लागला.