टोकियो - जपान ऑलिम्पिक समितीच्या एका अधिकाऱ्याने कोरोना विषाणूच्या सध्याच्या परिस्थितीमुळे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 'या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू जुलैपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी तयार नाहीत', असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा -कोरोना असला तरी आयपीएलमध्ये खेळणार 'हा' दिग्गज फलंदाज
जेओसी कार्यकारी मंडळाचे सदस्य असलेले सेवानिवृत्त जुडो खेळाडू काओरी यामागुची यांनी जपानी वृत्तपत्र 'निक्केई'ला ही माहिती दिली. 'ऑलिम्पिक अशा स्थितीत असू नये जिथे लोकं आनंद घेऊ शकत नाहीत. अमेरिका आणि युरोपमधील खेळाडू पात्रता सामने संपवू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना ऑलिम्पिकसाठी तयारी करणे कठीण ठरले आहे', असे यामागुची यांनी म्हटले आहे.
२७ मार्च रोजी होणाऱ्या जेओसीच्या बोर्ड बैठकीत आपण हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही यामागुची यांनी म्हटले आहे.