भुवनेश्वर - भारताची महिला धावपटू द्युती चंद हिच्या ऑलिम्पिक तयारीसाठीच्या कार विक्री करावी लागल्याच्या वृत्तावर ओडिशा सरकारने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 2015पासून द्युतीला 4.09 कोटी देण्यात आले असल्याचे ओडिशा सरकारने स्पष्ट केले. द्युतीने अलीकडेच फेसबुकवर तिच्या बीएमडब्ल्यू कार विक्रीची पोस्ट केली होती. मात्र, आक्षेपार्ह प्रतिक्रिया आल्यानंतर तिने ही पोस्ट काढून टाकली.
ओडिशा सरकारच्या क्रीडा विभागाने म्हटले, "द्युतीला एशियन गेम्स 2018मध्ये पदक जिंकण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणून 3 कोटी रुपये, 2015-19 मध्ये प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसाठी 30 लाख रुपये आणि टोकियो ऑलिम्पिक प्रशिक्षणासाठी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. राज्य सरकारने द्युती चंदला ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनमध्ये गट-अ दर्जाची अधिकारी (ए गोल्ड कॅटेगरी पीएसयू) म्हणून नियुक्त केले. सध्या ती दरमहा, 84,604 रुपये वेतन घेत आहे. तिला कार्यालयात येण्याची गरज नाही, जेणेकरून ती पूर्णपणे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकेल."