कराड (सातारा) - स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्यारे कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे सुपूत्र दिवंगत खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून आजही वंचित आहेत. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात त्यांनी कास्य जिंकले होते. आज त्यांचा स्मृतीदिन. दिवंगत खाशाबांनी कास्य पदक कसे जिंकले, याची कहाणी रोमांचक आहे. प्रतिकूल परिस्थितीत देशाला वैयक्तिक प्रकारात पहिले पदक मिळवून देणार्या खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या योगदानाचा सन्मान करावा, यासाठी देशभरातील कुस्तीगीरांचा पाठपुरावा सुरू आहे.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित खाशाबांच्या पदकाचा रोमांचक प्रवासहेलसिंकीची ऑलिम्पिक स्पर्धा संपायला फक्त 2-3 दिवस बाकी होते. अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान संपलेले होते. त्यामुळे संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद यांना हेलसिंकी शहर बघण्याची घाई झाली होती. इतरांनाही युरोपातले हे शहर मनसोक्त भटकायचे होते. या पर्यटनाच्या नादात प्रताप चंद खाशाबांच्या मॅचचा दिवसही विसरले. उलट खाशाबांना ते म्हणाले, तुझी मॅच उद्या आहे. तू आमच्याबरोबर फिरायला चल. खाशाबा मात्र एका मनसुब्याने हेलसिंकीला गेले होते. त्यांनी फिरायला जाण्यास नकार दिला आणि रिकाम्या वेळात इतर पैलवानांचे सामने बघण्यासाठी मैदानाच्या दिशेने निघाले. त्याचवेळी खाशाबांना त्यांचे नाव ध्वनीक्षेपकावरून ऐकू आले. त्यांनी चौकशी केली असता पुढचा सामना त्यांचाच असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याबरोबर भारतीय संघातील कुणीही नव्हते. त्या परिस्थितीत ते सामन्यासाठी मॅटवर उतरले. पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे बाय मिळाला. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवर त्यांनी लीलया मात केली.
..तर रौप्यही जिंकलं असतंखाशाबांना त्यांच्या गटात पाच सामने खेळायचे होते. पुढची क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेदबेयोव्हविरुद्ध होती. खाशाबांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. काही जाणकारांच्या मते, मॅचमध्ये पंचांचे काही निर्णयही खाशाबांच्या विरुद्ध गेले होते. मॅरेथॉन लढत खेळून खाशाबा दमले होते. पण, पुढच्या पंधरा मिनिटांत त्यांना पुढची फेरी खेळावी लागली. खरंतर ऑलिम्पिक स्पर्धेत दोन सामन्यांमध्ये किमान अर्ध्या तासाची विश्रांती आवश्यक असते. स्पर्धेचा तसा नियमच असतो. पण, हे सगळे नाट्य घडत असताना खाशाबा एकटेच तिथे होते. संघाचे व्यवस्थापक नसल्यामुळे त्यामुळे त्यांची बाजू मांडायला कुणीच नव्हते. शेवटी जपानच्या शोहोची इशी या मल्लाबरोबर खेळायला ते मॅटवर उतरले. थोड्या वेळातच 0-3 असा त्यांचा पराभव झाला. रशियाला सुवर्ण मिळाले आणि भारताला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. जर व्यवस्थापक खाशाबांबरोबर असते. त्यांनी बाजू मांडली असती किंवा पंचांच्या निर्णयावर दाद मागितली असती तर निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता.
पदक जिंकूनही आयुष्याची आबाळचखाशाबा गरीब शेतकरी कुटुंबातले होते. घरी कुस्तीचे वातावरण होते. पण, ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खाशाबांची आबाळच झाली. पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल चार वर्षांनी पोलीस खात्यात त्यांना नोकरी लागली. पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले. 22 वर्षं एकाही बढतीशिवाय त्यांनी सेवा केली. अखेर 1984 मध्ये एका मोटार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या गोळेश्वर गावाकडे जाणार्या रस्त्यावरील कार्वे नाक्यावर ऑलिम्पिक स्तंभ उभारण्यात आला आहे. तसेच कुस्ती केंद्रालाही मंजुरी मिळाली आहे.
मरणोत्तर पद्म पुरस्काराची प्रतिक्षाच दिवंगत खाशाबा जाधव यांना सरकारने मरणोत्तर पद्म पुरस्कार द्यावा, म्हणून त्यांचे सुपूत्र रणजित जाधव तसेच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कुस्तीगीर केंद्रीय स्तरावर प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक नियम पुढे करून केंद्र सरकारने मरणोत्तर पद्मसाठी खाशाबांच्या कुटुंबीयांना आणि खाशाबा प्रेमींना झुलवत ठेवले आहे. कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही नरेंद्र मोदींशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, केंद्र सरकारला खाशाबांच्या ऑलिम्पिक कामगिरीचे महत्व समजलेले नाही.
ऑलिम्पिकसाठी असा जमवला पैसाऑलिम्पिकला जाण्यासाठी खाशाबा जाधव यांना त्यांच्या गोळेश्वर गावातील लोकांसह कोल्हापूरच्या छत्रपतींनी अर्थिक मदत केली होती. 1948 व 1952 या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांसाठी त्यांनी स्वत: घरोघरी जाऊन पैसे गोळा केले होते. 1952 मध्ये तत्कालीन सरकारनेही खाशाबांना विशेष सहकार्य केले नव्हते. या प्रतिकूल परिस्थितीतही कुस्तीची तयारी, मॅटवरील सराव, परदेशी जाण्यासाठीच्या प्रशासकीय पूर्तता आणि त्यांना ऑलिंम्पिकला पाठवण्यास विरोध करणारे घटक, अशा अनेक आघाड्यांवर खाशाबा लढले होते. खाशाबांना अर्थिक मदत करण्यासाठी कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य दाभोळकर यांनी स्वत:चा बंगला गहाण टाकला होता. खाशाबा हे उपकार विसरले नाहीत. यशस्वी होऊन परतल्यानंतर त्यांनी कुस्त्यांची दंगल (स्पर्धा) भरवली. स्वत: बर्याच कुस्त्या जिंकून बंगला सोडविण्यासाठी प्राचार्य दाभोळकरांना मदत दिली.
शिवछत्रपती, अर्जुन पुरस्कारावर बोळवण1993 साली शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार (मरणोत्तर) आणि 2001 मध्ये केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार (मरणोत्तर) या पुरस्कारांनी खाशाबांचा गौरव झाला. खाशाबांच्या विजयाची आठवण म्हणून कोल्हापूरला विजयी मल्लाचे एक शिल्प घडवण्यात आले. गोळेश्वर गावातील एका तालीम आणि कराडच्या कार्वे नाक्यावरील ऑलिम्पिक स्तंभाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. खाशाबांनंतर ऑलिंपिकमध्ये भारताला कुस्तीत पदक मिळविण्यासाठी 56 वर्षे लागली. यावरून खडतर परिस्थितीतही खाशाबांनी मिळवलेल्या पदकाचे महत्त्व लक्षात येते. तरीही केंद्र सरकारला मरणोत्तर पद्म पुरस्काराने खाशाबांच्या कामगिरीचा यथोचित सन्मान करावा, असे वाटत नाही, हे महाराष्ट्राचे आणि देशातील तमाम कुस्तीगीरांचे दुर्दैव आहे.