हैद्राबाद : भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर ज्यावेळी खेळायचा तेव्हा त्याला बाद करणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असायचे आणि त्याच्या पहिल्याच मॅचमध्ये जर कोणी सचिनची विकेट मिळवली तर ती एकप्रकारे त्या गोलंदाजाची मोठी कामगिरी मानली जायची. एका नवीनच पदार्पण केलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिल्या वनडेत सचिनची विकेट घेतली. त्याने त्यावेळी सचिनची घेतलेली विकेट सामन्याचे विजयात रूपांतर करून गेली.
या खेळाडूने घेतली होती सचिनची विकेट :क्लिंट मॅके असे या नवीन पदार्पण केलेल्या खेळाडूचे नाव होय. क्लिंट मॅकेचा आज वाढदिवस आहे. या तरुण खेळाडूचा जन्म 20 फेब्रुवारी 1983 साली झाला. त्याचा तो पहिलाच सामना होता. त्याच्या या कामगिरीने सामन्याला कलाटणी भेटली आणि सामना फिरला. त्याने सचिनला बाद केले नसते, तर 2009 मध्ये सचिनने हैदराबादमध्ये भारताला अवघड आणि एक शानदार विजय मिळवून दिला असता.
सचिनने केली होती विक्रमी खेळी :क्लिंट मॅकेने त्यावेळी सचिनची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून दिला असला, तरी सचिनची 175 धावांची अप्रतिम खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींमध्ये गणली जाते. भारत हा सामना हरला आणि सचिनची 175 धावांची शानदार खेळी त्यावेळी कामी आली नाही, हे सर्वात मोठे दुःख होते. सचिनची तडाखेबंद फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियन संघ पुरता हादरला होता, पण क्लिंट मॅकेने त्याच्या एका चेंडूने ऑस्ट्रेलियन संघाला आराम दिला होता.
ऑस्ट्रेलियाने उभारली होती मोठी धावसंख्या :हा अभूतपूर्व सामना 5 नोव्हेंबर 2009 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. या सामन्यात रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. शॉन मार्शने 112 आणि शेन वॉटसनने 93 धावांची दमदार खेळी केली होती. मार्शने 112 चेंडूंचा सामना करीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. वॉटसनने ८९ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि तीन षटकार ठोकले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी केली होती. या दोघांनंतर पाँटिंगने 45 चेंडूत 45 धावा केल्या. कॅमेरून व्हाईटने 33 चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत चार गडी गमावून 350 धावांचा डोंगर उभा केला होता.
एकीकडे सचिनची झंजावती खेळी :लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पटापट आपल्या विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाची धावसंख्या चार विकेट्सवर 162 धावा होती. सचिन एक टोक सांभाळत असला आणि तुफान धावा काढत होता. त्याला सुरेश रैनाची साथ लाभली आणि दोघांनी शतकी भागीदारी केली. रैना टीम इंडियाच्या एकूण 299 धावसंख्येवर बाद झाला. त्याने 59 चेंडूत 59 धावा केल्या. हरभजन सिंगही एका धावेनंतर बाद झाला.
सचिनचे मैदानावर वादळ तरी टीम इंडिया पराभूत :दुसऱ्या बाजूला सचिन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत होता आणि तो सामना जिंकेल असे वाटत होते. सचिन मैदानावर चौफेर फटके मारत होता. त्याची बॅटींग पाहून ऑस्ट्रेलियन कांगारूंच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. रिकी पाँटिंगला काय करावे कळत नव्हते. त्यावेळी त्याने नवख्या तरुण क्लिंट मॅकेला गोलंदाजीसाठी बोलावले. आश्चर्य म्हणजे मॅकेने या वादळाला म्हणजे सचिनला अॅडम वोजेसकडे झेलबाद केले. सचिन बाद झाला तेव्हा त्याची धावसंख्या 141 चेंडूत 175 होती. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि चार षटकार मारले. सचिन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 332 होती आणि भारताला विजयासाठी 16 धावांची गरज होती. सचिनची तीन षटके होती. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून असे वाटत होते की, त्याने संपूर्ण सामना खेळला असता तर त्याने टीम इंडियाला सहज सामना जिंकून दिला असता, परंतु तसे झाले नाही आणि अखेरीस भारताला तीन धावांनी सामना गमवावा लागला.
हेही वाचा : Indian Super League : ईस्ट बंगालचा मुंबई सिटी एफसीवर पहिला विजय