नवी दिल्ली : भारताची युवा स्टार बॉक्सर नीतू घनघस हिने इतिहास रचला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात शनिवारी खेळल्या गेलेल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नीतूने बाजी मारली आहे. 45-48 वजनी गटात खेळत नीतूने या चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. नीतू घनघसने अंतिम सामन्यात मंगोलियाच्या लुत्सेखान अटलांसेटसेगचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
नीतू घनघस प्रथमच बनली विश्वविजेती :नीतू घनघस प्रथमच विश्वविजेती ठरली आहे. नीतूने अंतिम सामन्यात शानदार खेळ दाखवला. तिने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या प्रतिस्पर्धी मंगोलियावर दबाव कायम ठेवला आणि एकतर्फी झालेल्या सामन्यात 5-0 असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. नीतू बऱ्याच काळापासून चांगली कामगिरी करीत होती. जगातील महान बॉक्सर एमसी मेरी कोम हिला पराभूत केल्यानंतर नीतू प्रसिद्धीच्या झोतात आली. IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची दावेदार म्हणून नीतूचाही विचार केला जात होता.
नीतू घनघसची यशस्वी कारकिर्द :नीतू घनघसने 2012 मध्ये बॉक्सिंग करिअरला सुरुवात केली. नीतूने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि आता महिलांच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून 125 कोटी भारतीयांना अभिमान वाटला आहे. चार भारतीय बॉक्सिंग खेळाडू निखत जरीन, लोव्हलिना बोरगोहेन, नीतू घनघस आणि स्वीटी बुरा यांनी आपापल्या वजन गटात महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात नीतू घनघास हिने सुवर्णपदक पटकावले आहे. आज स्विटी बुराही तिच्या अंतिम सामन्यात रिंगमध्ये उतरणार आहे. तिचा सामना भारतीय वेळेनुसार 7:45 वाजता सुरू होईल.
भारतासाठी सुवर्णक्षण :महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या चार बाॅक्सर अंतिम फेरीत पोहचल्याने भारतासाठी हा सुवर्णक्षण आहे. त्याचबरोबर नीतू 45 ते 48 वजनी गटात सुवर्णपदक पटकावल्याने भारतासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. इतर तीनही खेळाडू अंतिम फेरीत पोहचल्याने भारताला त्यांच्याकडूनसुद्धा अपेक्षा आहे.
हेही वाचा : IPL Records For Maximum Match : 'या' टीमच्या नावावर आहे सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा रेकॉर्ड; पाहा अन्य संघांची कामगिरी