मुंबई - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या या कामगिरीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे एका ट्विटवरुन सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.
नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटवरुन वाद सुरू झाला आहे. खेलरत्न पुरस्कारवरून राजीव गांधींचे नाव काढताच सुवर्ण पदक आलं आहे, असे अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशोक पंडित यांच्या या ट्विटवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, काही तासांपूर्वीच भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले. त्यांनी या पुरुस्काराचे नवे नाव, मेजर ध्यानचंद असे केलं आहे. या विषयावरून वादविवाद सुरू आहे. अशात अशोक पंडित यांनी वादग्रस्त ट्विट करत आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे.