नवी दिल्ली Neeraj Chopra : ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा शनिवारी (१६ सप्टेंबर) रोजी अमेरिकेत खेळल्या गेलेल्या युजीन डायमंड लीग २०२३ च्या अंतिम फेरीत ट्रॉफीचा बचाव करण्यात कमी पडला. स्पर्धेत त्यानं ८३.८० मीटर थ्रो करून दुसरं स्थान पटकावलं.
झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूनं ट्रॉफी जिंकली : झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेचनं डायमंड ट्रॉफी जिंकली. त्यानं ८४.२४ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. तर फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरनं ८३.७४ मीटरच्या थ्रोसह तिसरं स्थान पटकावलं. विश्वविजेता नीरज चोप्रा डायमंड ट्रॉफीचा गतविजेता होता. मात्र तो आपल्या विजेतेपदाचा बचाव करणारा केवळ तिसरा खेळाडू बनू शकला नाही. झेक प्रजासत्ताकच्या विटेझस्लाव्ह वेसेली (२०१२ आणि २०१३) आणि जेकब वडलेच (२०१६ आणि २०१७) यांनी या आधी आपल्या विजेतेपदाचा बचाव केला आहे.
नीरज नेहमीच्या लयीत दिसला नाही : अंतिम फेरीत नीरज त्याच्या नेहमीच्या लयीत दिसला नाही. त्याचे दोन प्रयत्न फाऊल झाले. त्याचे उर्वरित तीन प्रयत्नही सामान्यच राहिले. दुसरीकडे जेकब वडलेचनं पहिल्या थ्रोपासूनच आघाडी कायम राखली. नीरजनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झुरिच येथं झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं.