मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरची युवा कुस्तीपटू सोनाली मंडलिकसाठी मदतीसाठी हात पुढे केला आहे. सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
सोनाली अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपरेवाडी गावात राहते. तिने 'खेलो इंडिया' स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याशिवाय तिने इतर स्पर्धांमध्ये देखील उत्तम कामगिरी करत पदकं मिळवली आहेत. पण, घरातील परिस्थितीमुळे तिला पुढे जाण्याची संधी मिळत नव्हती. सध्या ती तिच्या घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव करते. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते कसाबसा ५ व्यक्तींच्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.
आपल्या मुलीने कुस्ती प्रकारातून भारताचे प्रतिनिधीत्व करावं, अशी इच्छा सोनालीच्या वडिलांची आहे. मुलीला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने ते स्वतःसाठी घर नसतानाही गोठयात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.