मुंबई- कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे NBA लीग रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. NBA लीगमधील यूटाह जॅझ या संघाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जॅझ आणि थंडर्स यांच्यातील सामन्यापूर्वीच वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. अहवाल सादर झाल्यानंतर त्यात एक खेळाडू कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. तेव्हा सामनाही रद्द करण्यात आला आहे.
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच NBA ने एक निवेदन जारी केलं आहेत. त्यात त्यांनी, पुढील आदेश येईपर्यंत NBA चे सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी NBA कडून योग्य ती काळजी घेतली जाईल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे NBA च्या संघ मालकांनी बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
NBA ने यूटाह जॅझ संघातील कोरोनाग्रस्त खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. पण इंग्रजी माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, रुडी गोबर्ट, असे त्या खेळाडूचे नाव आहे. दरम्यान, गोल्डन स्टेट वॉरियर्स संघाचा पुढील आठवड्यातील सामना बंद स्टेडियमवर होईल.