नवी दिल्ली -राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारतीय वेटलिफ्टर सीमावर डोपिंगप्रकरणी ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) ही कारवाई केली. यावर्षी विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये डोपिंगची तपासणी करण्यासाठी सीमाचे नमुने घेण्यात आले होते, असे नाडाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -नील वॅगनर...कसोटीत न्यूझीलंडकडून २०० बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज
सीमाचा तपशीलवार अहवाल एडवर्स अॅनालिटिक्स फाइंडिंग (एएएफ) कडे परत आला असून, त्यामध्ये बंदी घातलेल्या पदार्थांचे नमुने सापडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व पदार्थांवर वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीने (वाडा) बंदी घातली आहे. 'कामगिरी सुधारण्यासाठी चॅम्पियनशिपमध्ये या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तिच्यावरील गुन्हा अधिक गंभीर झाला आहे. फसवणूक आणि नाडाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे', असे या निवेदनात म्हटले आहे.