नाशिक -यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी' किताब या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद मिळवत पैलवान हर्षवर्धन सदगीरने नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. ६३ वर्षानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धनच्या रुपाने हा बहुमान नाशिकला मिळाला आहे.
हेही वाचा -बंगळुरुच्या १७ वर्षीय यश अराध्याची गरूडझेप
येत्या २८ जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर्षवर्धनचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या क्रीडा निधीतून हर्षवर्धनच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचा खर्च देखील महानगरपालिका उचलेल असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे. हर्षवर्धनचा नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात यावा, आणि तीन लाख रोख रुपये आणि एक चांदीची गदा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी महासभेपुढे ठेवला होता.
नाशिक महानगरपालिका उचलणार महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा ऑलिम्पिकचा खर्च महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. टाहाकारी येथील अंबिका विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या मुकेश सदगीर यांचा हर्षवर्धन हा मुलगा आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून आई ठकूबाई सदगीर या गृहिणी आहेत, तर भाऊ जगन सदगीर हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे.