मुंबई - फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनचा तारांकित टेनिसपटू राफेल नदालने 14 व्यांदा धडक ( Rafel Nadal ) मारली. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सेटवेळी नदालचा जर्मन प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्हच्या उजव्या पायाला दुखापत झाली. यामुळे त्याला माघार घ्यावी लागली आणि नदालने २२ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे वाटचाल केली.
उपांत्य फेरीचा सामना खेळणाऱ्या नदाल आणि झ्वेरेव्ह यांच्यात दोन्ही सेटमध्ये कडवी झुंज झाली. पहिल्या सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात ६-६ अशी बरोबरी झाल्यावर टायब्रेकर खेळवण्यात आला. त्यामध्ये नदालने १०-८ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडू जिद्दीने लढले. दीड तासांनंतर या सेटमध्येही ६-६ अशी बरोबरी झाली आणि ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी पुन्हा टायब्रेकरचा मार्ग अवलंबवण्यात आला. दरम्यान, टायब्रेकरच्या सुरुवातीला आपल्या उजव्या बाजूला आलेला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात झ्वेरेव्ह पाय मुरगळून मैदानावर कोसळला.
झ्वेरेव्ह मैदानात कोसळल्यानंतर त्याने तात्काळ आपले उजवे पाऊल पकडले आणि जोरात ओरडला. तेव्हा ‘फिजिओ’नी मैदानावर धाव घेतली. तसेच, प्रतिस्पर्धी नदालने झ्वेरेव्हला फिजिओच्या साहाय्याने व्हिलचेअरवरती बसवण्यास मदत केली. नदालने झ्वेरेव्हची विचारपूस केली आणि त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. काही मिनिटांनंतर झ्वेरेव्ही कुबडय़ांच्या साहाय्याने कोर्टवर परतला आणि त्याने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी नदालने झ्वेरेव्हीची गळाभेट घेतली. नदालने दाखवलेल्या दिलदारपणावर भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.