मुंबई -बास्केटबॉल प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएचे भारतात आगमन झाले आहे. एनबीएचे इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स हे प्रमुख दोन संघ आज पहिल्यांदा मुंबईमध्ये प्री सीजन सामने खेळणार आहेत.
हेही वाचा -राष्ट्रकुल ज्युडो चॅम्पियनशिप : मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी ठरली सुपरस्टार, जिंकले सुवर्णपदक
बास्केटबॉल खेळाला भारतात लोकप्रिय करण्यासाठी एनबीएचा हा प्रयत्न आहे. इंडियाना पेसर्स आणि सॅक्रेमेंटो किंग्स या दोन दिग्गज संघांमध्ये होणाऱ्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. या दोन संघांना भारतात आणण्यासाठी सॅक्रेमेंटो किंग्सचे मालक विवेक रणदिवे यांनी खुप प्रयत्न केले होते. 'मी खुप उत्साही आहे. मी जिथे जन्माला आलो तिथे परत येऊन मला आनंद झाला. इंडियाना पेसर्स विरुद्ध सामना आयोजित करणे खुप खास आहे', असे रणदिवे यांनी म्हटले आहे.
रणदिवे पुढे म्हणाले, 'पुढील १० वर्षात भारतातून अनेक खेळाडू एनबीएमध्ये खेळतील. क्रिकेट नंतर बास्केटबॉल हा भारतातील लोकप्रिय खेळ असेल असा मला विश्वास आहे.' सॅक्रेमेंटो किंग्सचा स्टार खेळाडू शूटिंग गार्ड बडी हील्डने आपली प्रतिक्रिया दिली. 'आम्ही या सामन्यात नैसर्गिक खेळ करणार आहोत. तसेच यंदा सुरुवातीला केलेल्या चूका टाळणार असून आत्तापासूनच चांगली लढत देऊ', असे हील्ड म्हणाला.
मागच्या हंगामातील, प्लेऑफच्या पहिल्याच फेरीत इंडियाना पेसर्स संघाला बाहेर पडावे लागले होते. मागच्या चार वर्षांपासूनच पेसर्सचे आव्हान प्लेऑफच्या फेरीत संपुष्टात आले आहे. या सामन्यासाठी एनबीए आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या वतीने ७० शाळेतील ३००० विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले आहे.