मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत सेनेचे शिवबंधन हाती बांधलेल्या सचिन अहिर यांना क्रीडा क्षेत्रात सेनेच्याच मंडळींनी जागा दाखविली. याकारणाने ते बॅकफुटावर गेले आहेत. अहिर यांच्या विरोधातील खदखद मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून समोर आली आहे.
रविवारी भारतीय क्रीडा मंदिराच्या परिसरात झालेल्या या निवडणुकीत अहिर यांच्या कृष्णा तोडणकर गटाच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. निवडणुकीत चौथ्यांदा भाई जगताप यांचा मारूती जाधव गटाचे पॅनल विजयी झाले. इतकेच नव्हे तर संपूर्ण 25 जागा या जगताप पॅनलने जिंकल्या आहेत. मागील 15 वर्षांपासून भाई जगताप यांचे मुंबई शहर कबड्डी संघटनेवर ताबा असून तेच संघटनेची धुरा सांभाळत आहेत.
सचिन अहिर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कार्याला प्रभावित होऊन सेनेचे शिवबंधन बांधले. यानंतर त्यांच्यासाठी मुंबई शहर कबड्डी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची बनली हेाती. त्यासाठी शिवसेनेच्या पॅनलला अधिकाधिक विजयी करण्यासाठी अहिर यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले हेाते.
मतदानाच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना उपस्थित राहून मतदारांवर प्रभावही टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. तर दुसरीकडे सेनेचे अनेक नगरसेवक आणि आमदारही यावेळी उपस्थित असताना झालेल्या पराभवामुळे अहिर यांचा हा मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत अहिर गटाचे चिन्ह बाण होते तर प्रतिस्पर्धी गटाचे धनुष्य होते.