चंदीगढ- भारताचे महान आणि दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. ९१ वर्षी वय असलेले मिल्खा सिंग हे चंदीगढ येथील घरात क्वारंटाइनमध्ये राहात आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे मजते. फ्लाइंग शिख अशी ओळख असलेल्या मिल्खा सिंग यांनी आपण लवकरच बरा होईन असा विश्वास व्यक्त केला आहे.
''फ्लाइंग शीख मिल्खासिंग जी यांची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना हलका ताप आहे पण ते तंदुरुस्त आहेत आणि घरीच उपचार घेत आहेत.
त्यांच्याबद्दल व्यक्त होत असलेली कळकळ आणि असंख्य लोकांनी फोन करुन केलेल्या चौकशीमुळे ते भारावून गेले आहेत. चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत'', असे त्यांच्या अधिकृत ट्विटरवर लिहिण्यात आलंय.
मिल्खा सिंग यांच्या घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र मिल्खा सिंग यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दोन तीन दिवसात ते बरे होतील असा विश्वास त्यांना डॉक्टरांनी दिला आहे.
मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले.१९६०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये ते चौथ्या स्थानावर आले होते. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळालेले आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे.मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाइफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
हेही वाचा - श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय युवा संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रवीड