जिनिव्हा : फिफा 2022च्या सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉल खेळाडू पुरस्कारासाठी लिओनेल मेस्सी, किलियन एमबाप्पे आणि करीम बेंझेमा यांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. फिफाने शुक्रवारी ही घोषणा केली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषकात अर्जेंटिना अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून विश्वविजेता ठरला होता. मेस्सीने स्पर्धेचा गोल्डन बॉल जिंकला, तर त्याचा पॅरिस सेंट-जर्मेनचा सहकारी एमबाप्पे याने आठ गोलांसह गोल्डन बूट जिंकला.
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंची देखील निवड :रियल माद्रिदसह यूईएफए चॅम्पियन्स लीग आणि ला लीगा विजेतेपद जिंकल्याबद्दल किलियन एमबाप्पेचा देशबांधव बेन्झेमाने गेल्या वर्षी बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला होता, अशी बातमी शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली. पण दुखापतीमुळे विश्वचषक खेळू शकला नाही. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी स्पेनची ॲलेक्सिया पुटेलास, इंग्लंडची फॉरवर्ड बेथ मीड आणि अमेरिकेची ॲलेक्स मॉर्गन यांची निवड झाली.
या पुरस्कारांची घोषणा :सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडू, सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला प्रशिक्षक, सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला गोलकीपर आणि 2022 चा सर्वोत्कृष्ट गोल या पुरस्कारांची घोषणा 27 फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये केली जाईल. 2021-22 हंगामातील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, पत्रकार यांचा समावेश असलेल्या तज्ञांच्या पॅनेलने एकूण 14 खेळाडूंमधून तीन महिला खेळाडूंची निवड केली.