सिल्व्हरस्टोन - रेड बुल संघाचा ड्रायव्हर मॅक्स व्हर्स्टापेन २०२० मध्ये मर्सिडीज संघाव्यतिरिक्त शर्यत जिंकणारा पहिला ड्रायव्हर ठरला. ग्रँड प्रिक्सच्या ७० व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित शर्यतीत त्याने ही कामगिरी केली. मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन आणि त्याचा साथीदार वाल्टेरी बोटासला व्हर्स्टापेनने मागे टाकले.
या शर्यतीत व्हर्स्टापेनचा साथीदार अलेक्झांडर अल्बॉन पाचव्या क्रमांकावर राहिला. व्हर्स्टापेनचे मागच्या वर्षीच्या ब्राझीलनंतर हे पहिले विजेतेपद आहे. तर, २०१२ नंतर सिल्व्हरस्टोन ट्रॅकवर रेड बुलचा हा पहिला विजय आहे. या शर्यतीत हॅमिल्टनला दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दिग्गज रेसर लुईस हॅमिल्टन यंदा चांगल्या फॉर्मात असल्याने मॅक्स व्हर्स्टापेनचा हा विजय विशेष मानला जात आहे. मर्सिडीज संघाचा ड्रायव्हर असलेल्या हॅमिल्टनने कारकिर्दीतील विक्रमी सातवी ब्रिटिश ग्रां.प्री. शर्यत जिंकली आहे. शेवटच्या लॅपमध्ये टायर पंक्चर झाल्यानंतरही हॅमिल्टनने विजेतेपद मिळवले. त्याने यंदाच्या हंगेरीयन ग्रँड प्रिक्स शर्यतीचे जेतेपदही जिंकले आहे. या विजयामुळे हॅमिल्टनने दिग्गज मायकल शुमाकरच्या विक्रमाची बरोबरी केली. आता शुमाकर आणि हॅमिल्टन यांच्या नावावर एका सर्किटवर सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम आहे.
हंगेरीयन ग्रँड प्रिक्स शर्यतीचे हॅमिल्टनचे हे आठवे विजेतेपद आहे. तर शुमाकरनेही आठ वेळा ही शर्यत जिंकली आहे. हॅमिल्टनचे हे एकूण ८६ वे ग्रँड प्रिक्स विजेतेपद असून तो आता शुमाकरच्या सर्वाधिक ग्रँड प्रिक्स विजेतेपदाच्या विक्रमापासून पाच विजय दूर आहे.