पुणे - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशात पटियाला येथे आयोजित महिला बॉक्सिंगपटूचे ट्रेनिंग शिबीराचे ठिकाण हलवण्यात आले आहे. आता हे शिबीर पुण्यामध्ये होणार आहे. यात देशातील अव्वल महिला बॉक्सिंगपटू सहभागी होणार आहेत.
पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये सुरक्षित वातावरणात हे सराव शिबीर होणार आहे. सहावेळची विश्वविजेती आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती एम सी मेरी कोम देखील या शिबीरात सहभागी होणार आहे. यात एकूण १० महिला बॉक्सिंगपटू सहभागी होणार आहेत. यातील तिघी या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आहेत.
मेरी कोमसोबत सिमरनजीत कौर आणि लवलिना बोरगोहेन या ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेल्या बॉक्सिंगपटू देखील या शिबीरात सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय शिबीर ३१ जुलैपर्यंत होणार आहे. यानंतर सर्व खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला रवाला होतील.