लंडन : झेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवा हिने विम्बल्डन 2023 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी (15 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात वोंड्रोसोवाने ट्युनिशियाच्या ओन्स जाबेरचा ६-४, ६-४ असा पराभव केला. बिगरमानांकित वोंद्रोसोवाच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना एक तास 20 मिनिटे चालला.
पहिली बिगरमानांकित महिला विम्बल्डन चॅम्पियन : 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवा ही विम्बल्डन चॅम्पियन बनणारी ओपन एरामधील पहिली बिगरमानांकित महिला खेळाडू आहे. यापूर्वी 1963 मध्ये बिगरमानांकित बिली जीन किंगने फायनलमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर तिला ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्गारेट कोर्टकडून पराभव पत्करावा लागला होता. सहाव्या मानांकित ओन्स जाबेरला अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्याचवेळी वोंड्रोसोवाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ दाखवला. वोंड्रोसोवाने सातपैकी सहा वेळा जाबेरची सर्व्हिस मोडली. दुसरीकडे, जाबेर 10 पैकी केवळ चार वेळा विरोधी खेळाडूची सर्व्हिस मोडू शकली.
ओन्स जाबेरचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव : 28 वर्षीय ओन्सने सलग दुसऱ्या वर्षी विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती, पण ती पुन्हा एकदा विजेतेपदापासून वंचित राहिली. गेल्या वर्षी जाबेरला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकीनाने पराभूत केले होते. ओन्सने यूएस ओपन 2022 च्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, पण तिथेही तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत ४२ व्या क्रमांकावर असलेल्या मार्केटाची ही दुसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. मार्केटा 2019 च्या फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती, जिथे तिला पराभवाचा सामना करावा लागला.
नोव्हाक जोकोविचचा सामना कार्लोस अल्कारेझशी : दुसरीकडे, पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत रविवारी (१६ जुलै) सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझशी होणार आहे. जोकोविचने उपांत्य फेरीच्या सामन्यात आठव्या मानांकित इटलीच्या यानिक सिनरचा ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्कारेझने तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवचा ६-३, ६-३, ६-३ असा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले आहे. यूएस ओपन 2022 चा विजेता अल्कारेझला गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता अल्कारेझला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. तर जोकोविच आपले 24वे ग्रँडस्लॅम आणि एकूण आठवे विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा :
- Wimbledon Logo Maharashtra : महाराष्ट्राच्या कलाकारांनी 100,000 चौरस फूट मैदानावर साकारला विम्बल्डनचा 'सर्वात मोठा' लोगो!