रशिया -एकीकडे आज मेरी कोम आपल्या बॉक्सिंग अभियानाला सुरुवात करणार आहे तर, दुसरीकडे मंजू राणीने जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ४८ किलो वजनी गटात झालेल्या या सामन्यात तिने व्हेनेझुएलाच्या रोजस तायोनीस सेडेनोवर ५-० अशी मात केली. सहाव्या मानांकित मंजू राणीला जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.
हेही वाचा -'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला
अव्वल सीडेड दक्षिण कोरियाच्या किम ह्यांग मीशी उपांत्यपूर्व फेरीत मंजू राणीचा सामना होईल. याआधी ६४ किलो वजनी गटात भारताच्या मंजू बंबोरियाला पराभव पत्करावा लागला. चौथ्या सीडेड इटलीच्या अँजेला कारिनीसोबत तिचा सामना रंगला होता. बंबोरियाने हा सामना १-४ असा गमावला.
दुसरीकडे जगज्जेती आणि भारताची शान असलेली मेरी कोम आजपासून आपल्या बॉक्सिंग अभियानाला सुरुवात करणार आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना थायलंडच्या जुटामास जिटपाँग हिच्याशी होईल. बऱ्याच काळानंतर मेरी कोम मैदानावर उतरणार असून ती कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.