मुंबई - राष्ट्रीय प्रशिक्षकाचा सल्ला न ऐकण्याचा प्रकार भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिला चांगलाच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. मनिकावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत भारतीय टेबल टेनिस संघाकडून कठोर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
काय आहे हे प्रकरण -
मनिका बत्रा खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्यासह टोकियोला पोहोचली होती. परंतु आयोजकांनी सामन्याच्या वेळी खासगी प्रशिक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही. तेव्हा मनिकाने पुन्हा आपल्या प्रशिक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. परंतु आयोजकांनी फक्त राष्ट्रीय प्रशिक्षकच सामन्याच्या वेळी हजर राहू शकतात, असे स्पष्ट शब्दात सांगितलं. तेव्हा चिडलेल्या मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांचा सल्ला ऐकला नाही.
आता हे प्रकरण खूपच चर्चेत आहे. यावर भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव अरुण कुमार बॅनर्जी यांनी सांगितले की, "मनिकाने शिस्त पाळलेली नाही, त्यामुळे तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे."