पुणे - महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. त्याने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. विजयाची घोषणा झाल्यानंतर हर्षवर्धनने उपविजेता सहकारी मल्ल शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून घेत खिलाडूवृत्ती दाखवत, मैत्रीचे दर्शन घडवले. दोस्तीत कुस्ती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही असे म्हटले जाते, याचा प्रत्यय पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
हर्षवर्धनने अखेरच्या काही सेंकदात लढत जिंकली. विजयाची घोषणा सरपंचांनी केली तेव्हा हर्षवर्धनला आनंद तर झालाच. मात्र त्याच आनंदात हर्षवर्धनने खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले. त्याने प्रतिस्पर्धी आणि त्याचा सहकारी असलेला शैलेश शेळकेला खांद्यावर उचलून घेतले. त्याची ही कृती पाहता त्याने फक्त महाराष्ट्र केसरीची गदाच जिंकली नाही तर उपस्थितांची मनंही जिंकली.