महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Maharashtra Kesari 2023: शिवराज राक्षेने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा.. थरारक सामन्यात महेंद्र गायकवाड चितपट

महाराष्ट्र केसरी २०२३ च्या अंतिम फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड लढत झाली आहे. पुण्यामध्ये या स्पर्धेचा थरार रंगला. शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला असून त्याने महेंद्र गायकवाडला चितपट केले. यावेळी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

Maharashtra Kesari 2023 १
पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार.. 1

By

Published : Jan 14, 2023, 7:37 PM IST

Updated : Jan 14, 2023, 10:54 PM IST

पुण्यात महाराष्ट्र केसरीचा रंगला थरार

पुणे: 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल ही काका पवार यांच्या तलीमीच्या पैलवनांमध्ये झाली आहे. या स्पर्धेत सेमीफायनल सामन्यात हर्षवर्धन सदगिर आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. यात 8 - 1 ने शिवराज राक्षे हा विजयी झाला आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना हा सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात रोमहर्षक असा झाला आहे. यात महेंद्र गायकवाड याने 6 - 4 ने सामना जिंकला आहे. तर अंतिम सामन्यात शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. त्याने महेंद्र गायकवाडला चितपट केले.

महाराष्ट्र केसरीची गदा प्रदान : मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

तालीमीचे वस्ताद यांना श्रेय : आम्ही दोघेही एकाच तालमीच्या असून आमच्यात दोस्ती त कुस्ती झाली.पण आम्ही कुस्तीत दोस्ती केली नाही.आज मी जो महाराष्ट्र केसरी झालो आहे त्याचा सर्व श्रेय माझ्या तालीमीचे वस्ताद काकासाहेब पवार यांना जात असल्याच मत राक्षे याने व्यक्त केले आहे. कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.

तिघे काका पवार तालमीचे:यातील विशेष बाब म्हणजे यंदाच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगिर, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड हे काका पवार यांच्या तालमीचे असून, फायनलमध्ये दाखल झालेले दोन्ही पैलवान हे महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे हे देखील काका पवार यांच्या तालीमीचे पैलवान आहेत. गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे या दोन मित्रांची लढत झाली.

मोहोळ क्रीडानगरीत आयोजन:मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. आज स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाडनं सिकंदर शेखवर ६-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

राक्षेचा एकतर्फी विजय:सुरुवातीपासून शिवराज राक्षे यानं सामन्यावर पकड मिळवली आहे. हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहोत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं एकतर्फी विजय मिळवला. शिवराज राक्षेनं ८-१ असा हर्षवर्धन सदगीरवर विजय मिळवला.

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे:शिवराज राक्षे हा अर्जुनवीर काका पवार यांच्या तालमीतील पट्ठ्या आहे. पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरूनगर जवळील राक्षेवाडीचा तो रहिवासी आहे. त्याचे वडील छोटे शेतकरी असून, त्यांचा दुधाचा छोटासा व्यवसाय आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने आहार सुद्धा पूर्ण होत नव्हता. शिवराज राक्षेचे वडील देखील एक पैलवान होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कुस्ती सोडावी लागली होती. आता ते शेती करतात आणि डेअरी चालवतात. आता ते आपल्या पैलवान मुलाच्या माध्यमातून आपलं स्वप्न साकार करण्यासाठी उत्सुक आहेत. पैलवान शिवराज राक्षे म्हणतो की, मी एका सामान्य घरातील मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी नेहमीच साथ दिली आहे. माझ्या वडिलांना मला ऑलम्पिकमध्ये लढताना त्यांना बघायचंय आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने लढणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांची घोषणा : आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल. असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

मिशन ऑलिम्पिक : कै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर महाराष्ट्र पदक मिळविणाऱ्या मल्लांना तयार करण्यात मागे राहिला. ही उणिव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणारा किमान एकतरी मल्ल महाराष्ट्राचा असेल अशी मोहिम सुरू करण्यात येईल. महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेतल्यास शासन त्यालाही सहकार्य करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. अत्यंत रंजक महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपल्याला पहायला मिळाल्या असे सांगून त्यांनी यशस्वी पैलवान, कुस्तीप्रेमी नागरिकांचे अभिनंदन त्यांनी केले. मुरलीधर मोहोळ यांनी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.



मानधनात भरीव वाढ : डोळ्याचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धीचातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत १० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याची त्यांनी सांगितले. खासदार तडस आणि ब्रिजभुषण सिंह यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. महिलाही या क्षेत्रात ताकदीने पुढे येत असल्याने भविष्यात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण यांचे भाजपकडून जोरदार स्वागत

Last Updated : Jan 14, 2023, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details