पुणे - नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिम सामन्यात लातूरच्या शैलशे शेळकेचा ३-२ ने पराभव करत मानाची गदा पटकावली. या विजयानंतर हर्षवर्धनने उपविजेता शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन खिलाडूवृत्ती दाखवत मैत्रीचे दर्शन घडवले. दोघेही काका पवार यांचे पठ्ठे असून अंतिम लढतीत दोनही मल्लांनी जिरगबाज खेळ केला. विजयानंतर हर्षवर्धनने प्रतिक्रिया देताना आई-वडिल, वस्ताद यांच्यासह चाहत्याचे आभार मानले.
दोन भावांमध्ये अंतिम लढत होती. या लढतीत काटें की टक्कर पाहायला मिळाली. आम्ही दोघांनीही कोणताही भेदभाव केला नाही. शेवटच्या सेकंदापर्यंत चांगली लढत झाली. यामुळे खूप आनंद झाला असल्याचेही, हर्षवर्धनने सांगितले.
महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर बोलताना हर्षवर्धन सदगीर... शैलेश आणि हर्षवर्धन हे काका पवार यांच्या तालमीत शिकत असल्यामुळे दोघांनाही एकमेकांची बलस्थान आणि कच्चे दुवे माहित होते. पहिल्या डावात दोघांनीही बचावात्मक खेळ केला. पण अती बचावात्मक कुस्ती खेळल्याने पंचांनी शैलेश शेळकेला एक गुण बहाल केला.
दुसऱ्या डावातही चुरस पाहायला मिळाली. दोनही मल्ल एकमेकांना वरचढ होण्याची एकही संधी देत नव्हते. तेव्हा शेवटचे दीड मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धनला एक गुण अती बचावात्मक पद्धतीने मिळाला आणि त्याने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर शैलेशला एक गुण मिळाला. तेव्हा मात्र, शेवटच्या २० सेंकदात हर्षवर्धनने निर्णायक २ गुण घेत बाजी मारली आणि मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
दरम्यान, यंदाचा नवा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देण्यात आली.