सोलापूर- आपण केवळ भाषणबाजीतच पुढे आहोत, मात्र जवळपास १३५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलम्पिकसह अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही याची खंत वाटते, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी केले, ते सोलापुरात बोलत होते.
२३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेला आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. राज्याचे राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मोठ्या थाटात या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आपली ही खंत व्यक्त केली आहे.
या प्रसंगी कोश्यारी म्हणाले, 'आपण केवळ भाषणबाजीतच पुढे आहोत, मात्र जवळपास १३५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारताला ऑलम्पिकसह अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही याची खंत वाटते. एवढेचं नाही मी ज्या राज्याचा राज्यपाल आहे, तो महाराष्ट्रदेखील खेळाच्या बाबतीत मागे आहे.'