मुंबई : लिओनेल मेस्सी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी स्पॅनिश क्लब बार्सिलोनामध्ये दाखल झाला होता. त्यावेळी त्या चिमुकल्याची पूर्ण शारीरिक वाढही झाली नव्हती. मात्र तरीही बार्सिलोनाने त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजली होती. आज तेच मूल जागतिक फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळखले जाते! अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेस्सीचा शनिवारी 36 वा वाढदिवस आहे. तो आता त्याच्या बालपणीच्या क्लबकडून खेळत नसला तरी, मेस्सी आणि अर्जेंटिना मात्र आयुष्यभर एकमेकांना पूरक राहतील.
2004 मध्ये बार्सिलोनासाठी पदार्पण केले : मेस्सीने 2004 मध्ये बार्सिलोनासाठी पदार्पण केले. पदार्पणातच त्याने त्याचे फुटबॉल कौशल्य दाखवले. मात्र त्यावेळी 16 वर्षीय मेस्सीला संघातील रोनाल्डिन्होसारख्या स्टार्ससमोर फारसे महत्त्व मिळाले नाही. त्यानंतर 2005 मध्ये त्याने अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये अंडर-20 विश्वचषकाच्या रुपात पहिली फिफा स्पर्धा जिंकली. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये लिओ मेस्सीने अर्जेंटिनासाठी पदार्पण केले. त्यानंतर या 'अर्जेंटिनियन वंडर बॉय' ची सर्वत्र चर्चा सुरु झाली. 2006 मध्ये लिओने अर्जेंटिनासाठी विश्वचषकातील सर्वात तरुण फुटबॉलपटू म्हणून पदार्पण केले.
बार्सिलोनाचा सर्वात महान खेळाडू बनला : मेस्सीचा जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून खऱ्या अर्थाने प्रवास 2007 मध्ये सुरू झाला. त्याने बार्सिलोनाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रिअल माद्रिदविरुद्ध पहिली हॅटट्रिक नोंदवत जागतिक फुटबॉलला आपल्या आगमनाचा संदेश दिला. तो 2004 पासून ते 2021 पर्यंत बार्सिलोनाकडून खेळला. या काळात त्याने क्लबचा आतापर्यंतचा सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून स्वत:ला सिद्ध केले. तसेच एका क्लबसाठी 672 गोल करणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे. इतकेच नाही तर बार्सिलोनासोबतच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत मेस्सीने 10 ला लीगा जेतेपदे जिंकली. तसेच या काळात बार्सिलोनाने 4 चॅम्पियन्स लीग, 7 कोपा डेल रे, 8 सुपर डी एस्पाना, 3 क्लब वर्ल्ड कप आणि 3 युरोपियन सुपर कप जिंकले. 2021 मध्ये त्याने जड अंत:करणाने बार्सिलोनाचा निरोप घेतला आणि फ्रेंच लीग वन क्लब पॅरिस सेंट-जर्मनमध्ये दाखल झाला.