मुंबई -टोकियो ऑलिम्पिकमधील कास्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने एका मोठ्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. बजरंगच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे त्याने आगामी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे.
बजरंग पुनियाला जून महिन्यात रशियामध्ये पार पडलेली अली अलियेव स्पर्धेत दुखापत झाली होती. यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंगच्या दुखण्याने डोके वर काढले. यामुळे तो जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार नाही.
यंदा जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा नॉर्वे येथे 2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. परंतु या स्पर्धेत बजरंग पुनिया सहभागी होणार नाही. बजरंगच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप बरी झालेली नाही. डॉक्टरांनी त्याला सहा आठवड्यांचा आराम सांगितला आहे. यामुळे तो सराव करू शकणार नाही.
बजरंग पुनियाने ऑलिम्पिकला जाण्याआधी जून महिन्यामध्ये रशियात एमआरआय स्कॅन केला होता. यानंतर त्याने कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात क्रीडा चिकित्सक केंद्राचे प्रमुख डॉ. दिनशॉ परदीवाला यांचा उपचारासाठी सल्ला घेतला होता.