नवी दिल्ली -मर्सिडीजचा चालक लुईस हॅमिल्टनने रविवारी पार पडलेल्या टस्कन ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदासह त्याने फॉर्म्युला वनमधील ९०वा विजय आपल्या नावावर केला. हॅमिल्टन आता दिग्गज रेसर मायकेल शुमाकरच्या विक्रमापासून एक पाऊल दूर आहे.
मुगेलो ट्रॅकवर खेळवण्यात आलेली ही शर्यत अतिशय खडतर होती. या शर्यतीत अनेक दुर्घटना घडल्या. पहिल्या सात फेरीत दोन धडक पाहायला मिळाल्या. त्यामुळे सहा चालकांना शर्यतीबाहेर व्हावे लागले. दुसऱ्या धडकेत पहिल्यांदा या शर्यतीचे निलंबन करावे लागले.
लान्स स्ट्रॉलच्या धडकेनंतर पुन्हा शर्यतीला सुरुवात झाली. त्यामुळे वाल्टेरी बोटासला हॅमिल्टना मागे टाकण्याची संधी मिळाली. मात्र, हॅमिल्टनने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. रेनॉल्टच्या रिकियार्डोने बोटासला पछाडले. मात्र, काही वेळातत बोटास पुढे गेला. हॅमिल्टननंतर तो दुसऱ्या स्थानी राहिला.
बोटासने प्रयत्न केला आणि शेवटी तो १.१ सेकंदाने हॅमिल्टनच्या मागे राहिला. त्याने बोनस गुण मिळवण्यासाठी सर्वात वेगवान लॅप पूर्ण केली. रेड बुलचा ड्रायव्हर अलेक्झांडर अल्बॉनने तिसरे स्थान मिळवत आपल्या कारकिर्दीतील पहिली पोल पोझिशन मिळवली. हॅमिल्टनने आगामी होणारी रशियन ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली, तर तो शुमाकरच्या ९१व्या फॉर्म्युला वन विजयाच्या विक्रमाशी बरोबरील करेल. याव्यतिरिक्त, तो शूमाकरच्या सात जागतिक जेतेपदांच्या विक्रमाच्याही जवळ पोहोचेल.