नवी दिल्ली -मर्सिडिज संघाचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने आपला विजयीरथ कायम राखला आहे. हॅमिल्टनने कारकिर्दीचा ८८ वा विजय नोंदवत स्पॅनिश ग्रां.प्री. खिशात घातली. हॅमिल्टन आता मायकेल शुमाकरच्या सर्वाधिक विजयाच्या विक्रमापासून तीन पावले दूर आहे.
या विजयासह हॅमिल्टनने गुणतालिकेत ३७ गुणांची कमाई केली आहे. शिवाय त्याने मायकेल शुमाकरचा विक्रम मोडत १५६ व्या पोडियम फिनिशची नोंद केली. हॅमिल्टनने दुसऱया क्रमांकावर राहिलेल्या मॅक्स व्हर्स्टापेनचा २४ सेकंदानी पराभव केला. व्हर्स्टापेनने शेवटच्या नऊ शर्यतीत आठ वेळा पोडियममध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. वाल्टेरी बोटास तिसर्या क्रमांकावर राहिला.
तत्पूर्वी, वाल्टेरी बोटासने स्पॅनिश ग्रँड प्रिक्सच्या पहिल्या सराव शर्यतीत त्याचा सहकारी हॅमिल्टनला मागे टाकत वेगवान वेळेची नोंद केली होती. तर, फेरारीच्या सेबेस्टिन व्हेटेलने पाचवे स्थान पटकावले होते.
हॅमिल्टन ब्रिटिश ग्रां.प्री.चाही विजेता -
लुईस हॅमिल्टनने कारकिर्दीतील विक्रमी सातवी ब्रिटिश ग्रां.प्री. शर्यत जिंकली आहे. शेवटच्या लॅपमध्ये टायर पंक्चर झाल्यानंतरही हॅमिल्टनने विजेतेपद मिळवले. या शर्यतीत रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे स्थान राखले. त्याने हॅमिल्टनपेक्षा सहा सेकंद अधिक घेतले. फेरारीचा चार्ल्स लेक्लर्क तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हॅमिल्टनचा संघसहकारी वाल्टेरी बोटासच्याही गाडीचाही टायर पंक्चर झाला. त्याला ११ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.