जर्मनी - मर्सिडीजचा चालक लुईस हॅमिल्टनने मायकेल शुमाकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हॅमिल्टनने रविवारी आयफेल ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली. यासह हॅमिल्टनने शुमाकरच्या ९१व्या फॉर्म्युला वन विजयाची बरोबरी केली. यावेळी शुमाकरचा मुलगा मिकने आपल्या वडिलांचे जुने हेल्मेट हॅमिल्टनला भेट म्हणून दिले.
हॅमिल्टनचा सहकारी वाल्टेरी बोटास ही शर्यत पूर्ण करू शकला नाही. हॅमिल्टनने रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनला पाच सेकंदाने पराभूत केले. रेनोचा डॅनियल रिकार्डो तिसऱ्या स्थानावर राहिला.
पोर्तुगालमध्ये होणाऱ्या बाराव्या फेरीच्या ग्रँड प्रिक्स शर्यतीत हॅमिल्टनला शुमाकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ही शर्यत घेण्यात येणार आहे. जर्मनीच्या मायकेल शुमाकरने फॉर्म्युला वनच्या इतिहासात सर्वाधिक ७ वेळा विश्वविजेतेपदे जिंकली आहे. हॅमिल्टनकडे सध्या ६ विश्वविजेतेपदे आहेत.
कोरोनाव्हायरस दरम्यान फॉर्म्युला वनचा हंगाम ३ जुलैपासून ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्सपासून सुरू झाला. यावेळी सहा महिन्यात १७ शर्यतींचे आयोजन होणार असून त्यापैकी ११ शर्यती पार पडल्या आहेत. या अकरापैकी ७ शर्यती हॅमिल्टनने आपल्या नावावर केल्या आहेत.