लंडन - मर्सिडीजचा चालक लुईस हॅमिल्टनने यंदाच्या टस्कन ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यासोबतच तो दिग्गज रेसर मायकेल शुमाकरच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला. एक स्वप्नवत कारकिर्दीकडे वाटचाल करणाऱ्या हॅमिल्टनवर एक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या क्रौर्यविरोधी संदेशासह हॅमिल्टनने या स्पर्धेत एक टी-शर्ट परिधान केले होते. त्यामुळे फॉर्म्युला-वनकडून हॅमिल्टनवर कारवाई केली जाऊ शकते. ''एफआयए ही एक बिगर राजकीय संस्था आहे. हॅमिल्टनने नियम मोडले आहेत, की नाही या विषयावर अद्याप चर्चा सुरू आहे'', असे मोटारस्पोर्ट्स गव्हर्निंग मंडळाच्या (एफआयए) प्रवक्त्याने म्हटले आहे.
"ब्रॉन टेलरला मारणाऱ्या पोलिसांना अटक करा", असे हॅमिल्टनच्या टी-शर्टवर लिहिले होते. सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीय महिला ब्रॉन टेलरला पोलिसांनी आठ गोळ्या घातल्या होत्या. त्यापूर्वी अमेरिकन कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लाई़डची हत्या झाली होती. या हत्येनंतर जगभरात 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' चळवळ उभी राहिली. टस्कन शर्यत जिंकल्यानंतर हॅमिल्टन म्हणाला, "मला हे टी-शर्ट मिळण्यास उशीर झाला. लोकांना रस्त्यावर ठार मारले जात आहे, हे मी लोकांच्या लक्षात आणू इच्छितो.''
हॅमिल्टनने आगामी होणारी रशियन ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली, तर तो शुमाकरच्या ९१व्या फॉर्म्युला वन विजयाच्या विक्रमाशी बरोबरी करेल. याव्यतिरिक्त, तो शूमाकरच्या सात जागतिक जेतेपदांच्या विक्रमाच्याही जवळ पोहोचेल.