बुलडाणा -चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एका पोलीस महिलेने बाजी मारली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली. भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मोनालीने ७२० पैकी ७१६ गुण मिळवित दोन सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळविले आहे.
बुलडाण्याची लेडी सिंघम चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी - जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा
बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली. भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मोनालीने ७२० पैकी ७१६ गुण मिळवित दोन सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळविले आहे.

मोनाली जाधव ही २०१३ मध्ये पोलीस दलात भरती झाली असून ती बुलडाण्यामधील आनंद नगरची राहवासी आहे. मोनाली आंतरराष्ट्रींय खेळाडू सुद्धा आहे. चीनच्या चेंगडू येथे ८ ते १८ ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले.
मोनालीने फिल्ड आर्चरीत सुवर्ण, तर थ्रीडी आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले आहे. तिने याआधी मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना नववे स्थान मिळविले होते. मोनालीला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले. तिच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.