कोल्हापूर :जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेमध्ये कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील ( Shooter Anushka Ravindra Patil ) हिची भारतीय संघात निवड ( Selection in Indian team ) झाली. ही स्पर्धा 9 मे ते 20 मे या कालावधीत जर्मनीमधील सूल येथे होणार आहेत. 25 मीटर स्टैंडर्ड पिस्तूल प्रकारातून ती सहभागी होणार आहे. प्रथमच मुलींसाठी नॅशनल रायफल असोसिएशनने 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्टल या खेळ प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा भोपाळ, मध्यप्रदेश येथे घेतल्या. यामध्ये यश मिळवत तिने जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान पटकावले आहे.
नेमबाजी स्पर्धेसाठी सराव करताना कोल्हापूरची अनुष्का पाटील
पहिल्यांदाच मुलींसाठी निवड चाचणी - 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्टल ( 25m standard pistol ) या खेळ प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा, पूर्वी फक्त मुलांच्यासाठी घेतल्या जात होत्या. मात्र यावेळी मुलींच्या घेण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय निवड चाचणीमध्ये चाचणी 1 आणि 2 मध्ये अनुक्रमे 551 व 548 गुण मिळवत एकूण 1099 गुणांची कमाई केली. या स्पर्धेच्या रँकिंग नुसार प्रथम पाच मुलींची भारतीय संघात निवड होणार होती. या स्पर्धेमध्ये सर्व राज्यातून आलेल्या स्पर्धक मुलींमध्ये कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने चमकदार कामगिरी करत, भारतीय संघाच्या प्रथम पाच मुलींमध्ये आपले स्थान निश्चित केले.
अनुष्का सोबत 'यांचा' संघात समावेश -25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल गटात अनुष्का बरोबर रिदम सांगवा (हरियाणा), नाम्या कपूर (दिल्ली), निवेदिता नायर (तामिळनाडू) यांची जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. या निवडीमुळे कोल्हापूरचे खेळाडू अंतरराष्ट्रीय स्थरावर आपले नाव गाजविण्याचा आता सज्ज झाले आहेत, हेच अनुष्काने दाखवून दिले आहे. अनुष्काने या अगोदर आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आशियाई नेमबाजी स्पर्धा व जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. तसेच विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक -अनुष्काचा या निवडीबद्दल कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवछत्रपती क्रीडापीठाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी अभिनंदन केले. अनुष्का ही क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर साखरे, पुणे प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील, नवनाथ फडतरे, गोखले कॉलेजचे दौलत जयकुमार देसाई, शिवानी देसाई, प्राचार्य पी.के. पाटील, क्रीडाशिक्षक आदींचे सहकार्य लाभले.
हेही वाचा -कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे राज्य सरकारचे; राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला गृहराज्यमंत्र्याचे उत्तर